दिनांक: भारतीय सौर १० आषाढ शके १९३७, १ जुलै, २०१५
आमचे सरकार आले तर अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात तुरूंगात डांबणार, गजाआड करणार- विनोद तावडे, २०१४ विधानसभा निवडणूक प्रचार.
विनोद तावडे यांच्याकडे शिक्षण खात्याचा कारभार, गृहमंत्रालयाचा कारभार फडणवीस यांनी ठेवला स्वतःकडेच.-महाराष्ट्र मंत्रिमंडळ वाटप, आॅक्टोबर २०१४
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची इंजिनियरिंगची पदवी बोगस, पदवी दिलेल्या विद्यापीठाला सरकारची मान्यताच नव्हती. तावडेंनी निवडणूक आयोगासमोर केले खोटे शपथपत्र- जून २०१५
विनोद तावडेंना 'अागी'चे चटके, १९१ कोटींचे कंत्राट वादात, निविदा न मागवता तावडेसाहेबांनी अग्नीयंत्रांचे कंत्राट दिले.-मटा बातमी ३० जून १५
तावडेसाहेब! आपण काय करून बसलात हे? कोणाच्या नादी लागलात? माणूस पाहून तरी बोलायचे होते. राजकारणातील राजा ज्याला म्हणले जाते त्या प्रत्यक्ष शरद पवारांच्या पुतण्याला आपण धमकी दिली?
बरं दिली तर दिली, चुनावी जुमला म्हणून सोडून द्यायचे की नाही. तर तुम्ही बसलात सिंचन घोटाळ्यातील कागदपत्रे शोधत.
तुम्हाला शिक्षणमंत्री केले तेव्हाच तुम्ही हे समजायला पाहिजे होते. शिव्या खाण्याचे हे खाते आहे हे लक्षात यायला पाहिजे होते. तसे शिक्षण खात्यात आपण चांगले काम करत आहात. आम्हाला आता तरी तसेच दिसते आहे. परंतु ......
परंतु .... आता तुमच्या लक्षात आले असेल की काय राजकारण आहे? म्हणून सिंचन घोटाळ्यातील कागदपत्रे शोधायच्या भानगडीत पडू नका, मंत्रालयाच्या आगीत त्या सर्वच नस्ती (फायली) जळून नष्ट झाल्या आहेत. त्या शोधायचा प्रयत्न केल्यास तुमच्याच अशा बिनकामाच्या भानगडी बाहेर पडत राहतील.
म्हणून एक सांगतो. पटले तर बघा. अजित पवारांना गजाआड करू असे बोललो होतो पण तो एक 'चुनावी जुमला' होता, असे बेलाशक जाहिर करुन टाका. सिंचनात काही घोटाळा झालाच नाही असे जाहीर केले तर आणखी उत्तम. तसेच कसेही करून, अजितदादांच्या एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावून 'मी महिन्यातून दोन तिन वेळा दादांना फोन करुन त्यांचे मार्गदर्शन घेतो,' असे जाहिर करून टाका. सर्व अलबेल होईल.
(टिप: वरील लेखाचा खरे-खोटेपणाशी काहीही संबध नाही.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा