दिनांक : ३० एप्रिल, २०१६
काल दि. २९ एप्रिलच्या मटामध्ये (मुंबई टाइम्स, बझ स्टाॅप) एक चौकट होती. 'मोनिकाचं मराठी प्रेम' आणि लिहले होते की, 'अनेक स्टार्सनी मराठी शिकणं मनावर घेतल्याचं आपण बर्याचदा ऐकत असतो. 'मनमर्जिया' या नवीन हिंदी मालिकेच्या सेटवरही मराठीची शिकवणी सुरू आहे. या मालिकेतील 'मोनिका सेहगल' सध्या मराठी शिकतेय. या मालिकेच्या दिग्दर्शकासह बहुतांश कर्मचारी मराठी आहेत. ही मंडळी आपसांत 'मराठीतूनच' संवाद साधत असतात. अशा वेळी मोनिकाची 'पंचाईत' होते. कारण तिला मराठी येत नाही. पण या बयेनं 'त्यामुळे' मराठी शिकण्याचं मनावर घेतलं. आता शुटिंगच्या मधल्या वेळेत मराठीचे धडे गिरवतेय.'
या बातमीत विशेष काय असं विचारू नका. खुप महत्त्व आहे या बातमीतील आशयाला. मोनिकाने मराठी शिकण्याची तयारी का केली तर, तिची 'पंचाईत' झाली म्हणून. नाहीतर ती मराठी शिकली असती का? बिलकुल नाही. गरज का वाटावी त्यांना मराठी शिकण्याची? आपल्यालाच गरज नाही वाटत अजूनही तर त्यांना का वाटावी?
दोन दोन पिढ्या महाराष्ट्रात राहूनही मराठी न येणारे लोक माझ्या 'संबधात' आहेत. नाही येत मराठी त्यांना. याला कारणीभूत आपणच आहोत. एका अमराठी मित्रासाठी चार मराठी मित्र हिंदीत बोलताना मी पाहिले आहेत.
हे मान्य की आपण दादागिरी करून त्यांना मराठी शिकायला भाग पाडायला नको. तसे नाही करू शकणार मराठी माणूस. माहिती आहे मला. मध्ये राजसाहेबांनी खुप बोंबाबोंब केली तेव्हा कुठे अमिर खानला मराठी शिकण्याची उपरती झाली. नाहीतर त्याच्या वडिलांपासून ते मुंबईत राहतात. तेव्हा बरे त्याच्या हे लक्षात नाही आले? अमिताभ बच्चनसाहेब यांनी पण 'विहीर'सारखा उत्तम मराठी चित्रपट बणवला. हे फक्त एकाचे काम नाही. राजसाहेबांनी जे केले त्याला सर्वांकडून विरोध झाला. मराठी माणसांकडूनच. नका करू तसे. पण 'मनमर्जिया'च्या लोकांनी केली तशी पंचाईत तर आपण करू शकतो. काय करायचं ते करा. जसे जमेल तसे करा. अडचण होईल असे काहीतरी करा. अडवणूक झाली पाहिजे. नाइलाज झाला पाहिजे. महाराष्ट्रात राहायचं असेलतर, मराठी येणे अत्यावश्यक आहे, असे वाटले पाहिजे. दक्षिण भारतीय करतात तसे. अगदी तसेच. आठ दिवस त्यांच्यात राहा. नवव्या दिवशी त्यांची भाषा तरी शिका, नाहीतर बाडबिस्तरा उचला. असे करतात ते लोक. हसतात ते मराठी माणसाच्या अतिसहिष्णू प्रवृत्तीला. नको हो हसे करून घेऊ. सहन होत नाही पण सांगता येतंय, म्हणून सांगतोय.
या सर्व गोष्टींचा विचार करता, 'मनमर्जिया' या मालिकेच्या दिग्दर्शकासह समस्त मराठी कलाकार आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार!
तुमचे काय? तुम्ही देणार ना मला, तुमचेही अभिनंदन करण्याची संधी? लवकरात लवकर?