भारतीय सौर ३ ज्येष्ठ शके १९३७
२४ मे, २०१५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारमुक्त सरकार तसेच महागाईवर नियंत्रण ही आपल्या सरकारची सकारात्मक कामगिरी ठरली आहे, असे मोदीसरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीचे मूल्यमापन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २२ मे ला केले.
महागाईबद्दल नंतर बोलता येईल. पण भ्रष्टाचाराबाबत मोदीसरकारची दया येऊन काही जमलेतर मार्गदर्शन करावे, या व्यापक दृष्टीकोनातून त्यांना एक पत्र लिहले आहे. हे पत्र खाजगी असले तरी महाराष्ट्रातील फडणवीस सरकारला याचा काही लाभ मिळावा, म्हणून हे पत्र सार्वजनिक करत आहे.
माननिय अर्थमंत्री अरुण जेटलीसाहेब!
सा.न.वि.वि.
आपण मला ओळखत नसाल याची मला खात्री आहे. पण मी आपल्याला आणि भाजपसरकार मधील बर्याच मंत्री आणि संत्र्यांना ओळखतो. संत्री म्हणजे हिंदी मधील संत्री नसून नागपूर मधील प्रसिद्ध संत्री आहेत. त्याला हिंदीत नारंगी बोलतात. आपण जर गडकरीसाहेबांना विचारले तर ते संत्र्यांचा जागितक इतिहासपण सांगतील आणि नागपूरच्या संत्र्यांचा गोडवा विषद करतील. त्यांना वेळेची 'पुर्ती' जमत नसेलतर आमचे, आमचे म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननिय देवेंद्र फडणवीस यांना पाचारण करावे. ते सुद्धा संत्र्यांची इथंभूत माहिती आपल्याला देऊ शकतील. त्यांना आपण ओळखत असालच. वातावरण जरा हलकेफुलके व्हावे म्हणून सांगतो की फडणवीस म्हणजे 'दिल्लीत नरेंद्र राज्यात देवेंद्र' ह्या भाजपच्या घोषणेमधील देवेंद्र. हाहाहा! आले ना लक्षात? असो. मुख्य मुद्द्याला हात घालतो.
तर सांगायचा मुद्दा हा की आपल्या विधानामुळे माझ्या मनाची थोडी चलबिचल झाली. वर्षभरात आपल्याला एकही भ्रष्टाचार नाही करता आला, म्हणून मन हेलावले. 'भ्रष्टाचार मुक्त सरकार' ही आपली चांगली कामगिरी आहे की मनातील खंत? त्याचा उलगडा काही बातमीतून होत नाही. महाराष्ट्रातील नमोभक्त सतत आमच्या डोक्यावर मारा करत असतात की '६० वर्षे काँग्रेसने भ्रष्टाचारच केला.' त्यावरून मला वाटते की भाजपलाही थोडाफार करता यावा. म्हणूनच हा पत्रप्रपंच.
काही असनदशीर मार्ग मी सुचवत आहे. बघा जमले तर! हाहाहा! 'जुमले' नाही हो. तर ऐका.
मार्ग १
नोकरशाहीला हाताशी धरणे.
हा एक अतिशय उत्तम मार्ग अणि नामी उपाय आहे. यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या सचिवाची बदली अशा ठिकाणी करावी लागेल की जे ठिकाण म्हणजे त्या अधिकार्याला शिक्षा दिल्यासारखे वाटेल. आणि हो ही बदली इतरांना करायला सांगायची. स्वतः करायची नाही. जसे की नरेंद्र मोदी तुमच्या कार्यालयातील अधिकार्याची करतील. किंवा इतर मंत्री करतील. बदली झाली रे झाली की बोंब ठोकायची, की हा अधिकारी मला परत पाहिजे म्हणून. आणि मग बदली रद्द झाली की तो अधिकारी कायमचा तुम्हाला बांधील राहिल. असे एकमेकांच्या अधिकार्यांच्या बदल्या करुन सर्वच मंत्री स्वत:च्या सचिवांना कह्यात करू शकतील. हळूहळू मग त्या अधिकार्याबरोबर जवळकीनं वागा, बोला, त्यांच्या खाजगी आणि घरगुती कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावा. एकदा आपूलकी, प्रेम, जवळीक निर्माण झाली की ते स्वतःच तुम्हाला भ्रष्टाचाराचे सनदशीर मार्ग दाखवतील. भरपुर अनुभव त्यांच्या गाठीशी असतो. एकेका कडून लाख-लाख रूपये घेण्यापेक्षा शंभरात एकाकडूनच दोन कोटी कसे काढायचे, हा मार्गही ते दाखवतील.
मार्ग २
पवारसाहेबांना महिन्यातून कमीतकमी नऊ दहा वेळा फोन करणे.
लोकांना सांगायचे की शरद पवार साहेबांचा समाजसेवेचा अनुभव दांडगा आहे. शेतकर्यांच्या सुखदुःखे त्यांना माहित आहेत. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. आणि राजकारणात कोणीही अस्पृष्य नसतो. जसे गडकरीसाहेबांनी बघा कसे पवारसाहेबांचे मंत्रपदाची शपथ घेतल्यावर पाय धरले होते. तसेच. आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा हे मान्य केले की ते महिन्यातून तीन-चार वेळा शरद पवारसाहेबांना फोन करतात. तसेच करा. भरपूर फायदा होईल. नोकरशाहीला कसे कामाला लावायचे आणि आपलेसे करायचे हे त्यांच्यापेक्षा अधिक चांगले कोणीच राजकारणी जाणत नाही. १९९५ चा युतीचा काळ आपल्याला आठवत असेल. त्यावेळी असे बोलले जायचे की, प्रशासकीय आधिकारी मंत्र्यांची कामे बाजूला ठेवून अगोदर पवारसाहेबांचे कामे करायचे. इतका पाठिंबा त्यांना आहे आयएएस अधिकार्यांचा. मग बघा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भ्रष्टाचार करूनही नामनिराळे राहणे हे त्यांच्यासारखे कोणालाच जमणार नाही. त्यांच्या भ्रष्टाचाराचे ट्रॅकभर पुरावे गोळा करणारे स्वतःच नामशेष झाले. आता सिंचन घोटाळाच घ्या. तुमचे ते तावडेसाहेब बोलले होते बघा. अजितदादांना गजाआड टाकतो म्हणून. काय झाले? काहीच नाही. कागदपत्रेच जळाल्यावर कोण काय करणार? खुप जणांनी त्यांना धोबीपछाड मारण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण हे पैलवान उभेच. तर लावत चला त्यांना फोन, सतत.
दुसरे एक सांगायचे आहे की, भ्रष्टाचार मुक्त सरकार ही फार मोठी कामगिरी आहे हे लोकांना सांगत जाऊ नका. लोकांनी तुम्हाला मतदान त्यासाठीच केले आहे. सर्वांनाच माहित आहे की नवीन राज्यकर्त्यांना लगेच भ्रष्टाचार करता येत नाही. त्यासाठी लागेबांधे तयार व्हावे लागतात. काळ जाऊ द्यावा लागतो. 'पी हळद अन हो गोरी' असे सहसा घडत नाही. म्हणून असे विधाने करत नका जाऊ. आम्ही तुम्हा सगळ्यांना आमचेच पैसे खात बसावे म्हणून निवडून दिलेले नसते. काँग्रेसने ६० वर्षे केले ते आम्ही एक वर्षात केले नाही, याला काय अर्थ आहे साहेब? विचार करा! असू देत आता.
बरे! भेटू या परत असेच. मध्ये मध्ये. आपल्याला सांगण्यासारखे नवीन काही सुचले तर पत्र पाठवत राहिलच.
कळावे! लोभ असावा! भ्रष्टाचाराचा!
आपला हितैशी
रामदास पवार
-अंबरनाथ
ता.क.: हे पत्र विनोद निर्मितीसाठी लिहले असून माझ्यावर भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले म्हणून खटला वैगरे भरण्याच्या भानगडीत पडू नका. हाहाहा!
