शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०१५

असहिष्णू भारत!

दिनांक : २५ नोव्हेंबर, २०१५

हो! हो! भारत १००% असहिष्णू झाला आहे, असे मला वाटते आहे.

अमिर खानच्या बिचार्‍या बालिश बायकोने एक साधा प्रश्न विचारला, की आपण देश सोडून जाऊ या का म्हणून.  तर अमिर खानने तेव्हढ्याच निरागसपणे मिडियाला हा प्रश्न सांगितला. त्यात त्याचे काय चुकले? त्यासाठी एव्हढा गदारोळ माजला याचाच अर्थ भारत असहिष्णू झाला आहे. कोणालाही आपले मन मोकळे करण्याची मुभा देणे म्हणजे सहिष्णुता आहे. हो की नाही?

दुसरी गोष्ट म्हणजे बरेच लेखक आपले पुरस्कार परत करत आहेत. त्यात एव्हढे वाईट वाटण्यासारखे काय आहे? नाही आवडत त्यांना भाजप सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, साक्षी महाराज आणि बरेच लोक. त्यांना काँग्रेस जवळची वाटते हा काय गुन्हा आहे काय? नाही ना?  मग त्याचा इतका गवगवा कशाला? ते तर आपले पुरस्कार शांततेने परत करत आहेत. त्यांनी काही जाळपोळ, तोडफोड, खुन, मारामाऱ्या केल्यात की दहशतवाद माजवलाय?  त्यांना भारताचे वातावरण असहिष्णू वाटतंय तर वाटतंय.  लोकशाही आहे. कोणालाही काही वाटण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. अशा लोकांना देशद्रोही ठरवणे म्हणजे असहिष्णूता नाहीतर दुसरे काय आहे?

म्हणून मला वाटते भारताचे वातावरण असहिष्णू आहे. मला कोणी परदेशात पाय पण ठेऊ देणार नाही, नाहीतर ....

बाजीराव-मस्तानी

दिनांक : २२ नोव्हेंबर, २०१५

संजय लिला भन्सालीच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमा विरोधात भरपूर गदारोळ चालू आहे. मला वाटते की ऐतिहासिक व्यक्तींच्या बाबतीत चित्रपट लेखक, निर्माता यांनी खूपच काळजी घेतली पाहिजे. कोणाच्याही भावना दुखावणार नाही हे पहिले पाहिजे. परंतु आपल्या देशात लोकशाही असल्यामुळे आणि कोणालाही काहीही लिहता येते, व्यक्त होता येते. म्हणून लेखक, चित्रपट निर्मातेही काहीही लिहतात, दाखवतात. त्याला आपण कायद्याने काहीच करू शकत नाही. फक्त लोकशाही मार्गाने धरणे धरू शकतो. निषेध मोर्चे काढू शकतो. बाकी काहीच करू शकत नाही. मागे अमीर खानचा पीके आला. भरपूर विरोध झाला त्याला. पण काय झाले. काहीच नाही. उलट अती प्रसिद्धी मिळाली आणि चित्रपट भरपूर चालला. मागे जोधा अकबर हा चित्रपट आणि त्याच नावाची मालिका यांनाही भरपूर विरोध झाला. पण काय झाले? निर्मात्यांनी एक ओळ टाकली, 'हा चित्रपट ऐतिहासिक आहे,असा आम्ही दावा करत नाही.' बस! संपला विषय. चित्रपट प्रदर्शित झाला आणि मालिकाही. नंतर सर्व चिडीचूप.

आता बाजीराव मस्तानी या चित्रपटाबद्दल सुद्धा असे होऊ शकते. हा चित्रपट प्रदर्शित होण्याला अजूनही भरपूर वेळ आहे. १८ डिसेंबरला गोंधळ घालणार आहे तो. म्हणजे एक महिना आहे आणखी. तोपर्यंत तरी भंसाली काही करणार नाही. म्हणून तोपर्यंत 'पिंगा' या गाण्याला विरोध करणारे गोंधळ घालणार.  त्याच्या चित्रपटाला अशीच प्रसिद्धी मिळणार, फुकट. आणि शेवटी काय होणार? काहीही नाही. गाणे तसेच राहील आणि विरोधक सुद्धा गप्प बसतील.

कारण....

कारण चित्रपटात ज्या गाण्यात मस्तानी आणि काशीबाई यांना नाच करताना दाखवले आहे, त्या अगोदर फक्त श्रीमंत बाजीराव पेशवे असे स्वप्न पाहतील की मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाच करत आहेत. विषय संपला. बाजीरावांनी काय स्वप्ने पहिली असतील याची इतिहासात कुठेही नोंद नाही. याला इतिहासाचे विकृतीकरण म्हणता येणार नाही मग. कल्पनेची भरारी असेल ती. जशी '१५ लाख तो हरएकके खाते में ऐसेही जमा हो जायेंगे', तशी.

जाताजाता: चित्रपट खूप भव्यदिव्य आहे आणि सर्वांना तो आवडेल असे ट्रेलर वरून तरी जाणवत आहे. बेस्ट डायलॉग- बाजीरावने मस्तानीसे मोहब्बत की है,  ऐयाशी नही.

https://youtu.be/eHOc-4D7MjY

कडोंम महापौर

दिनांक: १४ नोव्हेंबर,२०१५

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर महापौर तर भाजपचे विक्रम तरे उपमहापौरपदी विराजमान झाले.
-बातमी

"कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे १४ नगरसेवक म्हात्रे आडनावाचे निवडून आले आहेत. त्या खालोखाल १३ भोईर आणि ११ पाटील आडनावाचे आहेत.
म्हणून महापौर म्हात्रे आडनावाचा, उप-महापौर भोईर आडनावाचा आणि स्थायी समिती अध्यक्ष पाटील आडनावाचाच पाहिजे होता.

लोकशाहीत बहुमताला काही महत्व आहे की नाही?  शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष हुकुमशाही पक्ष आहेत"

आतापर्यंत पवारसाहेब, राधाकृष्ण विखेपाटील यापैकी कोणीच असे का अजूनही बोलला नाही? काहीतरी गडबड आहे.

ताक: आता कमीतकमी स्थायी समिती अध्यक्ष तरी यापैकी कोणत्या तरी आडनावाचा झालाच पाहिजे, असे तरी बोला. म्हणजे विरोधी पक्ष कोणीतरी आहे याची जाणीव लोकांना होईल.

ही पोस्ट केल्यानंतर काहींच्या लक्षात हे आले नाही की ही पोस्ट उपरोधीक आहे. एका म्हात्रेने लिहले की आम्ही शिवसैनिक आहोत. वरुन जो आदेश येईल तो आम्ही मान्य करतो. तर एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने टिप्पणी केली की हा शिवसेना-भाजपचा अंतर्गत मामला आहे, त्या शरद पवार कशाला लक्ष घालतील.

चुकीची मराठी

दिनांक : १७ नोव्हेंबर, २०१५

'बरोबर पकडलं
माझ्यासोबत डिनर

जर तुम्हाला ऐकू येण्याची समस्या आहे तर लगेच तुमच्या जवळच्या हिअरिंग प्लस शाखेत पोचा. आणि योग्य हिअरिंग एड घेऊन माझ्यासोबत डिनरसाठी तयार होऊन जा.'
-कपिलदेवची मटामधिल जाहिरात

१) कपिलदेव बरोबर जेवण करण्यासाठी ऐकू येणे आवश्यक आहे का?

का?

असंच जमणार नाही का?

२) हिअरिंग एडच्या शाखेत पोचा (मारा) की पोहचा?

३) बरं ठिक आहे, पोहचलो.

नंतर? 

कपिलदेव बरोबर तयार होऊन कुठे जायचं?

घरी?

काय हे? आमच्या मराठी भाषेची पारच वाट लावतात हे लोक!

बिहार निवडणुकीत भाजपला घवघवीत यश?

दिनांक: ९ नोव्हेंबर, २०१५

बिहार निवडणुकीत भाजपला घवघवीत यश. विरोधकांचे दात घातले त्यांच्याच घशात. जे विरोधक भाजपला फक्त ६ जागा मिळाव्या म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते, त्यांना दिली एक सणसणीत चपराक. ६ च्या ठिकाणी ५३ जागा मिळवून दाखवल्या. लालू प्रसाद, काँग्रेस आणि नितीशकुमार यांची अभद्र युती झालेली असताना हे यश विशेष उल्लेखनीय आहे, यात तिळमात्र शंका नाही. विरोधक आता तोंड लपवून बिळात जाऊन बसले आहेत.

हाहाहा! मोदीजी और अमितजी तुसी ग्रेट हो!

©रामदास पवार
अंबरनाथ
(९ नोव्हेंबर, २०१५)

ज्यावेळी बिहार निवडणूकीचा निकाल लागला तेव्हा भाजपला बहुमत तर नाहीच परंतु खुपच कमी जागा मिळाल्या. त्यावेळी भक्त म्हणायला लागले की, मोदीजी एकलव्यासारखे एकटे बिहारमध्ये लढले. भाजप विरोधात लालू, नितिशकुमार, काँग्रेस एकत्र आले म्हणून भाजपचा पराभव झाला. बिहारचे लोक अडाणी आहेत. त्यांना जंगलराजच पाहिजे. लालूने नितिशकुमार यांना जरी मुख्यमंत्री बणवले असलेतरी खरा वचक लालूचाच राहिल कारण लालूला जास्त जागा मिळाल्या आहेत. या निवडणूकीने भाजपच्या गोटात बराच गोंधळ उडाला. अडवाणी, जोशी, शत्रुघ्न सिन्हा हे नाराज झाले.

वरील पोस्ट टाकण्यापुर्वी ४ आॅक्टोबरला खालील पोस्ट फेसबुकवर टाकली होती. ती पोस्ट मी पुन्हा वरील पोस्ट बरोबर शेअर केली. ती पुन्हा खाली देत आहे.

बिहारच्या निवडणूकीत भाजपचे 'दिल्लीपत' व्हावे. दिल्लीला तिन सिट मिळाल्या. त्यामुळे भाजपचे आमदार तिन आसनी रिक्शातून विधानसभेत जाऊ शकतात. बिहारमध्ये जागा अधिक आहेत. म्हणून त्यांना सहा सिट मिळाव्या. त्यामुळे भाजपच्या अामदारांना सहा सिटर रिक्षा वापरता यावी. भाजपच्या बर्‍याच लोकांची चरबी उतरावी. असे वारंवार का वाटते आहे, कळत नाही.
आता भक्त येतील आणि मला म्हणतील, 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.' तर काही म्हणतील, 'दुसर्‍याचे वाईट चिंतने सदृढ मनाचे लक्षण नाही.'
म्हणू देत. मला वाटतं ते लिहलं.

रामदास पवार
अंबरनाथ
(४ आॅक्टोबर, २०१५)

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

कल्याण-डोंबिवली मनसेचा शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा?

दिनांक: भारतीय सौर १५ कार्तिक शके १९३७,
६ नोव्हेंबर, २०१५

प्रिय राजसाहेब,
सस्नेह जय महाराष्ट्र!

बरेच दिवस पत्र लिहण्याचा खटाटोप केला नाही. मागच्या वर्षी सेना-भाजप युती तुटली तेव्हा आणि विधानसभेचे निकाल लागले तेव्हा पत्र लिहले होते. त्यानंतर तसा योगच जुळून आला नाही.

आज पुन्हा आपल्याला काही सांगायचे आहे. विधानसभेच्या विदारक पराभवानंतर आपण त्यांचे कारणे शोधली असतीलच. तरीही मला जी कारणे वाटतात ती सांगतो.
पहिले कारण असे की, मागच्या  लोकसभेला आपण विनाकारण उमेदवार उभे केले होते.
आपण वारंवार सांगत आला आहात की महाराष्ट्र हीच माझी खेळपट्टी आहे. तरीही आपण दिल्लीच्या मैदानात खेळाडू उतरवलेत आणि तेही मनसेची मातृ संघटना असलेल्या शिवसेने विरोधात. त्यात पुन्हा आपण हेही सांगितले की माझे खासदार मोदींना पंतप्रधान म्हणून पाठिंबा देतील. लोकांना जर असे वाटले असेल की सरळ घास घेण्यापेक्षा उलटा का घ्यावा, तर त्यांचे काही चुकले असे म्हणता येणार नाही. म्हणजे सरळ भाजप-सेनेलाच का मतदान करू नये. म्हणूनच लोकांनी भाजपला आणि भाजपची युती असलेल्या शिवसेनेलाच मते देऊन निवडून दिले.
आता आपण जसा निर्णय घेतला आहे की खासदारकीची निवडणूक यापुढे मनसे लढणार नाही हाच निर्णय जर तेव्हा घेतला असता तर झाकली मुठ सव्वा लाखाची झाली असती. इतकी अधोगती झाली नसती.  कारण तेव्हा आपला बराच दरारा होता. म्हणून तर नितिन गडकरींना आपल्या घरी येऊन आमच्या विरोधात उमेदवार उभे करू नका अशी विनवणी करावी लागली होती. बोलू नये पण बोलल्या शिवाय राहवत नाही. गडकरी काय आले अन 'भुरळली शेळी आणि लागली लांडग्याच्या पाठीमागे' अशी आपली गत झाली. लांडगेच ते. भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्ष नको आहेत. प्रादेशिक पक्षांना ते कधी शेळीसारखे खातील त्याचा भरवसा नाही. असो. झाले ते झाले. पण यापुढे अशा पक्षांपासून सावध रहा म्हणजे झाले. त्यांच्या जवळ जाऊन तोटाच होईल, ही रेल्वे इंजिन वरची चिमणी आहे. (काळ्या दगडावरची रेघ ऐवजी आपले इंजिन उदाहरणादाखल घेतले.) गरज सरो आणि वैद्य मरो अशी त्यांची रीत आहे. भाजपने मागच्या वर्षीच २५ वर्षांची युती तोडून याचा पुरावा दिला आहे.

आता मुळ मुद्याला हात घालतो. भाजपचे मधाचे बोट काय काय परिणाम करते ते आपण पाहिलेच. त्याचाच परिणाम म्हणून लोक आपल्याला राजकारणातून बाद करायला निघाले आहेत. म्हणूनच कल्याण-डोंबीवली महापालिकेत आपण २७ चे ९ वर आलो आहोत. तरी हरकत नाही. या ९ नगरसेवकांमुळे सुद्धा आपण भविष्यात मोठे यश गाठू शकता. अकबर बिरबलाची एक गोष्ट आहे. २७ मधून ९ गेले तर उरले काय? तर उत्तर आहे काहीच नाही. हे कसे तर २७ नक्षत्रांपैकी पावसाचे ९ नक्षत्र वजा केले तर काहीच शिल्लक राहत नाही. पाऊस नाही तर काही नाही. म्हणून आपले जे ९ नगरसेवक निवडून आले आहेत, ते पावसा इतकेच महत्वाचे समजा. आणि त्यांचा योग्य तो वापर करा.

म्हणजे काय करा की, आता जी कल्याण-डोंबिवली महापालिकेची त्रिशंखू अवस्था झाली आहे, तिला योग्य तो आधार द्या. शिवसेना आपली आहे. सेनेचे अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. म्हणून देऊन टाका शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा. भाजपचा घोडेबाजार आपोआप थांबेल. वळणावर येतील. लोकही शबासकी देतील.
करता राजसाहेब इतके? कराच! मग बघा!  पुढचा काळ गौरवशाली असेल. उद्धव आणि तुम्ही एकत्र आलात तर सर्वांचीच पळता भूई थोडी होईल.

लोभ आहेच, तो आणखी वृद्धिंगत व्हावा हीच इच्छा!