गुरुवार, ३० जुलै, २०१५

मृत महिलेचा मृतदेह शेतात आढळला?

दिनांक: २५ जुलै, २०१५

काल झी २४ तासच्या बदलत्या बातमी पट्टीवर लिहले होते,

'मृत महिलेचा मृतदेह शेतात आढळला'

आता तुम्ही सांगा मृतदेह हा मृतच असतो ना की जिवंत पण असतो? फक्त 'महिलेचा मृतदेह शेतात आढळला' इतके लिहले तरी पुरेसे आहे की नाही?

कोणी असे बोलले की

'जिवंत महिलेचा मृतदेह शेतात आढळला.'

तर कसे वाटेल?

पार वाट लावतात आपल्या मायमराठीची हे लोक.

बुधवार, २२ जुलै, २०१५

MB चे वजन कमी करायचे आहे.

दिनांक: २३ जुलै, २०१५

एका एमबी (MB) चे किती वजन असतो हो? कोणाला माहित आहे का? मी जसजसे फोनमध्ये नविन नविन अॅप्लिकेशन टाकतोय, तसतसे माझ्या फोनचे वजन वाढत चालले आहे. मी अधाश्यासारखे गुगल प्ले बुकवर फुकटचे पुस्तके डाउनलोड करतो आहे. तेच ६०० एमबीचे झाले आहेत. एव्हढेच कशाला मी तर चारपाच मराठी-इंग्रजी-मराठी शब्दकोष डाउनलोड केले आहेत. फुकटचे आहेत ना! मग काय? कशाला सोडायचे?

असेच खुप अॅप्लिकेशन आहेत. जे मला फोनमधून काढावे वाटत नाहीत. पण म्हणूनच फोनचे वजन वाढत चालले आहे.  संगणकशास्त्र खुप पुढारले आहे म्हणतात. मग यांना केबी, एमबी, जीबीचे वजन कमी करायला जमत नाही का? म्हणे नॅनो टॅक्नाॅलाॅजी आली आहे!

त्यांचे जाऊ द्या. आपल्यातील कोणीतरी यातील जाणकार मार्गदर्शन करील का? एमबीचे वजन कमी कसे करायचे? मी त्याचा आयुष्यभर ऋणी राहीन.

रामदास पवार
-अंबरनाथ
(२३ जुलै, २०१५)

मुंबईत राहणाऱ्या मांसाहारी मराठी लोकांना मोलाचा सल्ला

दिनांक: २० जुलै, २०१५

सुके बोंबिल घेऊन या. त्यांचे बिनकामाचे डोके किंवा एकदोन तुकडे तव्यावर जळेपर्यंत भाजा. त्याचा वास इतका येईल की संपूर्ण इमारतीत पसरेल. लोकांची सहनशक्ती वाढेल. तसेच ज्या डब्ब्यात बोंबिल ठेवाल त्याला ऊन देण्याच्या बहाण्याने रोज खिडकीत उघडे ठेवा. म्हणजे लोकांना त्या वासाची सवय लागेल.

काही दिवसांनी सर्वच शाकाहारी आणि गुजराती लोक तुमच्या हातापाया पडत येतील आणि म्हणतील तुम्ही 'मांसाहार करा पण बोंबिल आवरा!"

आणि हो कोणी भांडण करायला गुजरात्यांचा कळप आला की पटकन बोंबिल भाजायला विसरू नका. चिंगाट पळतील.

अजितदादांची गुगली

दिनांक: १८ जुलै, २०१५

परवा विधानसभेत अजित पवार म्हणाले, 'मोदींचा फोटो जर लावला नसता तर भाजपचे लोक कुठल्याकुठे उडून गेले असते.'

वा! दादा! वा! भाजपचे  आमदार, खासदार आणि प्रवक्ते यांना जागा दाखवली. एका दगडात दोन पक्षी मारलेत. मोदीकाका पण खुष अन  मोदी खुस तर सिंचन घोटाळा फुस.

भाजच्या लोकांची पार गोची करून टाकली. तुम्ही बोलले. त्यांनी ऐकले पण उत्तर काय देणार? दिले तरी अडचण नाही दिले तरीही….सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था.

हा म्हणजे 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे.'

शबाश अजितदादा! याला म्हणतात राजकारण! धरणात मुतत बसण्यापेक्षा हे चांगले आहे की दादा! लगे रहो!

नमोभक्तही आता अजितदादांचे विधान मान्य करतीलच. करावे लागेलच. पर्यायच नाही.

खरं की खोटं?

शुक्रवार, १७ जुलै, २०१५

फेसबुक मैत्री

दिनांका: १६ जुलै, २०१५

एका 'मुंगी'ची मैत्रीची विनंती आली. मान्य केली....
हाय-बाय झाले....
दोन दिवसांनी 'मुंगी' चा 'मुंगळा' झाला.
अय्यो! इतका मोठा पचका?

उद्धवसाहेब दृष्टी बदला-शेलार

दिनांक: १३ जुलै, १०१५

आशिष शेलार उद्धव ठाकरेंना 'दृष्टी' बदलायला सांगत आहेत.

शेलार साहेब, आपण अगोदर दिल्लीकडे 'दृष्टी' फिरवून, अर्धवट  शिकलेली 'स्मृती' बदला!

शनिवार, ११ जुलै, २०१५

त्यांना स्वाभिमान आहे की नाही, ठाऊक नाही.

दिनांक: ११ जुलै, २०१५

'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेला स्वाभिमान होता, सध्याच्या नेतृत्वाकडे तो आहे की नाही, माहित नाही. सत्तेसाठी 'दुसर्‍या'चा पाठिंबा घ्यावा लागल्याची खंत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केल्यानंतर, ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे त्यांना खंत वाटत असेल तर त्यांनी याबाबत फेरविचार करावा', असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मालवण येथे लगावला.
(मटा बातमी, ११/७/१५)

नाहीतर काय? काय करत आहे शिवसेना? लवकरात लवकर स्वतःहून बाहेर पडली तर आमचा किती त्रास वाचेल?  खुर्ची नाही म्हणून आमचे लोक किती खपाटीला लागले आहेत. बिचारे बिनकामाचे माशा मारत बसले आहेत. त्यात पुन्हा आमच्या छगन भुजबळ सारख्या मोहर्‍याला आम्हाला पणाला लावावे लागले आहे. किती सहन करायचे आम्ही? पंधरा वर्षे आमची सत्ता होती. कमीतकमी यावरून तरी अंदाज करा आम्हाला सत्तेच्या खुर्चीची किती चटक लागली असेल?

आम्ही नरेन भाईंना सांगून तुम्हाला अशी खाती दिली की तुम्हाला काही कामच करता येणार नाही. तुमच्या मंत्र्यांची कामे पण काढुन घेतली. तरी तुम्ही नुसता निषेधच चालवला आहे. खुर्चीला गोचीडासारखे चिटकून राहणे हा आमचा गुणधर्म आहे, तुम्हा मावळ्यांचा नाही.

खरे म्हणजे निकाल लागल्या लागल्या आम्ही भाजपला 'बाहेरून बिनशर्त पाठिंबा' देऊन नंतर शिताफिने आत घुसणार होतो, सत्तेत. पण नाही, तो पण आमचा गनिमीकावा तुम्ही निष्प्रभ करून टाकला.

तुम्हाला सर्वच मावळ्यांना माझी कळकळची विनंती आहे. सोडा ते मंत्रीपदे, मारा लाथ त्या खुर्चीला! दाखवा तुमचा मराठीबाणा! वय झाले पोरांनो माझे. एव्हढी दगदग सहन नाही होत आता. बाळासाहेबांचे आणि माझे चांगले संबंध होते. त्या संबंधांची आण आहे तुम्हाला. करा काहीतरी! म्हणा जय महाराष्ट्र भाजपला!

तुमचा शरदराव काका!

असेच काहीतरी बडबडत असतील ना पवारसाहेब?

बुधवार, ८ जुलै, २०१५

साधी पण सुंदर - दारुड्याची गोष्ट.

दिनांक: ९ जुलै, २०१५

(श्री @Keval Dhone याच्या चेपूवरील इंग्रजी गोष्टीचे स्वैर भाषांतर)

एक दिवस एक नवरा खुप दारू पिऊन घरी येतो. कप-बशा, चिनीमातीच्या प्लेट वगैरे तोडतो. उलट्या, ओकार्‍या करून सगळीकडे घाण करतो आणि जमिनीवर पडतो, निपचित. बायको त्याला कसेतरी पलंगावर झोपवते आणि सर्व साफसफाई करते. सकाळी जेव्हा नवरा उठतो तेव्हा खुपच घाबरलेला असतो. आता आपले काही खरे नाही. बायको भयंकर रागवणार, काहीबाही बोलणार याचा तो धसका घेतो. तो मनोमन प्रार्थना करतो की आता पुन्हा नवरा-बायकोत भांडणे व्हायला नको.

जेव्हा तो हाॅलमध्ये येतो, तेव्हा त्याला टेबलावर एक चिठ्ठी ठेवलेली दिसते.

घाबरतच तो चिठ्ठी उचलतो आणि वाचतो. 'माझ्या जानू, तुझा आवडता नाष्टा टेबलावर तयार ठेवला आहे. मला किराणा घेण्यासाठी जावे लागत आहे. मी येतेच लवकर. आय लव्ह यू!'

याचे त्याला खुप आश्चर्य वाटते. मग तो त्याच्या मुलाला विचारतो, 'काल रात्री काय झाले?'

मुलगा सांगतो....

'जेव्हा आईने तुम्हाला ओढत ओढत पलंगावर टाकले आणि ती तुमचे बूट आणि शर्ट काढण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तुम्ही जास्तच पिलेले होता आणि बडबडत होतात. 'ये बाई! मला सोड! माझे लग्न झालेले आहे."

फेसबुक

फेसबुकने रखा थोडा कामका,
वरना हम भी थे पुरे निकम्मे....

भगवानको प्यारा हो गया?

दिनांक: ८ जुलै, २०१५

कोणी वारल्यावर म्हणजे मृत्यू पावल्यावर हिंदीत बोलतात की, अमूक-तमूक 'भगवानको प्यारा हो गया!"
मला हे कळत नाही की, देवाला आवडणारे लोक जर देव स्वतःकडे बोलवून घेत असेलतर हे चूकीचे आहे. देवाने असे नको करायला.

त्यामुळे काय होते की लोक पापे करत बसतात कारण त्यांना जगायचे असते. पुण्य केले तर लगेच देवाला 'प्यारे झाले तर?"
म्हणून पापे करा! आयुष्य वाढवा! असे तर लोक समजत नसतील ना?

टीप: कोणी जास्त मनावर घेऊ नये, उलटेही असू शकते. काय भरवसा? उगीच माझं ऐकाल आणि फसाल. मी काही कोणी तत्वज्ञानी नाही हे सर्वांनाच माहीत आहे. हाहाहा!

शुक्रवार, ३ जुलै, २०१५

शाळाबाह्य मुले

दिनांक: भारतीय सौर १३ आषाढ शके १९३७, (४ जुलै, २०१५)

मदरशात शिकणारी मुले ही शाळाबाह्य मुले ठरवली जाणार म्हणून महाराष्ट्रात खुप गदारोळ उठला आहे. काँग्रेससहित ओवेसी सारखे रथीमहारथी या भांडणात पडले आहेत. मदरशात काय काय शिकवले जाते त्या भानगडीत मी पडत नाही कारण तो अातंकवादी विषय आहे. माझ्या बोलण्याने आतंक माजू शकतो म्हणून मुख्य गोष्ट सांगतो.
मदरसा असो किंवा वेदविद्यालय किंवा आणखी कोणती शिक्षणसंस्था, त्यांनी सरकारने स्थापन केलेल्या शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम अंगिकारलाच पाहिजे. सरकारची परवानगी घेतलीच पाहिजे. आणि सरकारने ठरवलेले अभ्यासक्रमच शिकवले पाहिजेत.

जर नसेल अशा अभ्यासक्रमाप्रमाणे शिक्षण द्यायचे तर......

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना जसे बोगस ठरवले जात आहे तसे तुम्हालाही ठरवले जाणार हे लक्षात ठेवा....
पण मला काय त्याचे? कशाला मध्ये पडू? Sin, Cos, Tan, काय असते हे जरी मला, आता माहित नाही, तरीही ते मी रितसर शिकलेलो आहे.

म्हणून माझे शिक्षण सरकार मान्य आहे. माझी पदवी बोगस नाही. मी शाळाबाह्य नाही.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

(टिप: लोगरीदम की लोगरिथम समजत नाही म्हणून दहावीत मी प्रश्न क्रमांक ६ कडे ढुंकूनही पाहिले नाही. )