मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०१५

नायक-खलनायक

दिनांक: ६ आॅक्टोबर, २०१५

टिव्हीवर जोधा अकबर आणि महाराणा प्रताप या दोन मालिकेतील अंतर फक्त दिड तासाचे आहे. साडेअाठला जोधा अकबर ही मालिका असते आणि दहा वाजता महाराणा प्रताप.  साडेआठला जो अकबर नायक असतो, तोच दहा वाजता खलनायक होतो.तेही रोज. जोधा अकबर मध्ये अकबर असा चितारलाय की त्याच्या सारखा राजा दुसरा कोणी नसावा. दयाळू. प्रेमळ. प्रजेवर अतोनात प्रेम करणारा. एकवचनी. स्वतःचे कोणतेही वचन पूर्ण करणारा. सहिष्णू. हिंदू आणि मुसलमान यांना समान हक्क देणारा राजा. कोणतेही भेदभाव न करणारा. म्हणजे आपल्याला तो पूर्णतः नायक वाटतो. त्याच्या आनंदात आपण सहभागी होतो. त्याचे दु:ख आपल्याला दुखी करते. याच्या नेमके उलट दहा वाजता असणाऱ्या महाराणा प्रताप या मालिकेत पाहायला मिळते. पक्का भुक्कड राजा. संपूर्ण हिंदुस्थानात एकछत्री अंमल व्हावा यासाठी कोणत्याही थराला जाणारा. राजपुत राजांमध्ये भांडणे लावणारा. जबरदस्तीने राजपुतांच्या बायका करून राज्य वाढवणारा. लढाईत शत्रुपक्षाच्या प्रजेला सुद्धा त्रास देणारा अमानुष राजा. विनाकारण महाराणा प्रताप यांना त्रास देणारा. ना बाईकांची ना आईची किंमत करणारा. असे वाटत राहते की याचे वाईटच व्हावे.

पण असे का व्हावे. राजा तर एकच आहे. या ऐतिहासिक मालिका आहेत. पूर्ण चित्रपटीय स्वातंत्र्य घेऊनही कोणी अधिक बदल करू शकत नाही. मग असे का होते? याचे कारण आहे या मालिकेचे लेखक. प्रत्येक मनुष्यात सद्गुण असतात तसे दुर्गुण सुद्धा असतात. पण जोधा अकबरचा लेखक आपल्या समोर अकबराचे फक्त सद्गुण दाखवतो. तर महाराणा प्रतापचा लेखक फक्त दुर्गुण. आणि तिथेच आपली फसगत होते. अवघ्या दिड तासात आपल्या मनात प्रेम आणि राग असे दोन्ही उत्पन्न होतात.

याचा अर्थ असा होतो की, कोणाला नायक किंवा खलनायक करायचे हे या मालिकेचे लेखक ठरवतात. दोन वेगवेगळे लेखक दिड तासात माझ्या मनाचे जादूई मतपरिवर्तन करू शकतात. म्हणून गांधी, नेहरू, सावरकर यांच्याविषयी मते बणवण्यापुर्वी विचार करा. कारण यांच्याविषयी सुद्धा लिहणार्‍या लेखकाने फक्त दुर्गुणच उचलले असतील तर? किंवा फक्त सद्गुण दाखवून वाईट गुणांकडे दुर्लक्ष करत असेल तर.

म्हणून कोणा विषयी मत बणवण्यापुर्वी हजारदा विचार करा.  नाहीतर आपली गत चक्रधरस्वामींच्या कथेतील पाच आंधळ्यांसारखीच होईल.

बिहार निवडणूक

दिनांक: ४ आॅक्टोबर, २०१५

बिहारच्या निवडणूकीत भाजपचे 'दिल्लीपत' व्हावे. दिल्लीला तिन सिट मिळाल्या. त्यामुळे भाजपचे आमदार तिन आसनी रिक्षातून विधानसभेत जाऊ शकतात. ज्या दिल्लीत लोकसभेच्या निवडणूकीत भाजपला सर्वच्यासर्व सर्व म्हणजे सातही जागा मिळाल्या, त्याच दिल्लीत भाजपला ७० पैकी फक्त ३ जागा जिंकता आल्या. सहा महिन्यात भाजपची अशी अधोगती झाली याला भाजपचा मुजोरपणा कारणीभूत होता. त्याची फळे भाजपला मिळाली.

आता बिहारच्या निवडणूका आहेत.  बिहारमध्ये जागा अधिक आहेत. म्हणजे दिल्लीपेक्षा अधिक. म्हणून त्यांना सहा सिट मिळाव्या. त्यामुळे भाजपच्या अामदारांना सहा सिटर रिक्षा वापरता यावी. भाजपच्या बर्‍याच लोकांची चरबी उतरावी. असे वारंवार का वाटते आहे, कळत नाही.

तसे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १ लाख २५ हजार कोटी रूपयाचे पॅकेज जाहीर केले. ते असे केले जसे बिहारचा लिलाव चाललाय. भाषणात ते म्हणाले, 'की भाईयों, आपको कितना पैसा चाहिए बोलो. साठ हजार करोड? सत्तर हजार करोड? अस्सी हजार करोड? नब्बे हजार करोड? मै पुरे सव्वासो हजार करोड रूपया बिहारको देता हुँ।" बिहारला मागच्या वर्षी पुर आला होता तेव्हा काश्मीरला गेले पण बिहारला मदत केली नाही. भाजपच्या लोकांना लोकसभेत बहुमत मिळाल्यापासून गर्व झाला आहे. हे गर्वाचे घर खाली व्हावे म्हणून वाटते फक्त सहाच जागा मिळाव्या.
आता भक्त मला म्हणतील, 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.' तर काही म्हणतील, 'दुसर्‍याचे वाईट चिंतने सदृढ मनाचे लक्षण नाही.'
म्हणू देत. मला वाटतं ते लिहलं.