बुधवार, ८ जुलै, २०१५

साधी पण सुंदर - दारुड्याची गोष्ट.

दिनांक: ९ जुलै, २०१५

(श्री @Keval Dhone याच्या चेपूवरील इंग्रजी गोष्टीचे स्वैर भाषांतर)

एक दिवस एक नवरा खुप दारू पिऊन घरी येतो. कप-बशा, चिनीमातीच्या प्लेट वगैरे तोडतो. उलट्या, ओकार्‍या करून सगळीकडे घाण करतो आणि जमिनीवर पडतो, निपचित. बायको त्याला कसेतरी पलंगावर झोपवते आणि सर्व साफसफाई करते. सकाळी जेव्हा नवरा उठतो तेव्हा खुपच घाबरलेला असतो. आता आपले काही खरे नाही. बायको भयंकर रागवणार, काहीबाही बोलणार याचा तो धसका घेतो. तो मनोमन प्रार्थना करतो की आता पुन्हा नवरा-बायकोत भांडणे व्हायला नको.

जेव्हा तो हाॅलमध्ये येतो, तेव्हा त्याला टेबलावर एक चिठ्ठी ठेवलेली दिसते.

घाबरतच तो चिठ्ठी उचलतो आणि वाचतो. 'माझ्या जानू, तुझा आवडता नाष्टा टेबलावर तयार ठेवला आहे. मला किराणा घेण्यासाठी जावे लागत आहे. मी येतेच लवकर. आय लव्ह यू!'

याचे त्याला खुप आश्चर्य वाटते. मग तो त्याच्या मुलाला विचारतो, 'काल रात्री काय झाले?'

मुलगा सांगतो....

'जेव्हा आईने तुम्हाला ओढत ओढत पलंगावर टाकले आणि ती तुमचे बूट आणि शर्ट काढण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तुम्ही जास्तच पिलेले होता आणि बडबडत होतात. 'ये बाई! मला सोड! माझे लग्न झालेले आहे."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा