शनिवार, ११ जुलै, २०१५

त्यांना स्वाभिमान आहे की नाही, ठाऊक नाही.

दिनांक: ११ जुलै, २०१५

'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेला स्वाभिमान होता, सध्याच्या नेतृत्वाकडे तो आहे की नाही, माहित नाही. सत्तेसाठी 'दुसर्‍या'चा पाठिंबा घ्यावा लागल्याची खंत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केल्यानंतर, ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे त्यांना खंत वाटत असेल तर त्यांनी याबाबत फेरविचार करावा', असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मालवण येथे लगावला.
(मटा बातमी, ११/७/१५)

नाहीतर काय? काय करत आहे शिवसेना? लवकरात लवकर स्वतःहून बाहेर पडली तर आमचा किती त्रास वाचेल?  खुर्ची नाही म्हणून आमचे लोक किती खपाटीला लागले आहेत. बिचारे बिनकामाचे माशा मारत बसले आहेत. त्यात पुन्हा आमच्या छगन भुजबळ सारख्या मोहर्‍याला आम्हाला पणाला लावावे लागले आहे. किती सहन करायचे आम्ही? पंधरा वर्षे आमची सत्ता होती. कमीतकमी यावरून तरी अंदाज करा आम्हाला सत्तेच्या खुर्चीची किती चटक लागली असेल?

आम्ही नरेन भाईंना सांगून तुम्हाला अशी खाती दिली की तुम्हाला काही कामच करता येणार नाही. तुमच्या मंत्र्यांची कामे पण काढुन घेतली. तरी तुम्ही नुसता निषेधच चालवला आहे. खुर्चीला गोचीडासारखे चिटकून राहणे हा आमचा गुणधर्म आहे, तुम्हा मावळ्यांचा नाही.

खरे म्हणजे निकाल लागल्या लागल्या आम्ही भाजपला 'बाहेरून बिनशर्त पाठिंबा' देऊन नंतर शिताफिने आत घुसणार होतो, सत्तेत. पण नाही, तो पण आमचा गनिमीकावा तुम्ही निष्प्रभ करून टाकला.

तुम्हाला सर्वच मावळ्यांना माझी कळकळची विनंती आहे. सोडा ते मंत्रीपदे, मारा लाथ त्या खुर्चीला! दाखवा तुमचा मराठीबाणा! वय झाले पोरांनो माझे. एव्हढी दगदग सहन नाही होत आता. बाळासाहेबांचे आणि माझे चांगले संबंध होते. त्या संबंधांची आण आहे तुम्हाला. करा काहीतरी! म्हणा जय महाराष्ट्र भाजपला!

तुमचा शरदराव काका!

असेच काहीतरी बडबडत असतील ना पवारसाहेब?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा