दिनांक: भारतीय सौर १५ कार्तिक शके १९३७,
६ नोव्हेंबर, २०१५
प्रिय राजसाहेब,
सस्नेह जय महाराष्ट्र!
बरेच दिवस पत्र लिहण्याचा खटाटोप केला नाही. मागच्या वर्षी सेना-भाजप युती तुटली तेव्हा आणि विधानसभेचे निकाल लागले तेव्हा पत्र लिहले होते. त्यानंतर तसा योगच जुळून आला नाही.
आज पुन्हा आपल्याला काही सांगायचे आहे. विधानसभेच्या विदारक पराभवानंतर आपण त्यांचे कारणे शोधली असतीलच. तरीही मला जी कारणे वाटतात ती सांगतो.
पहिले कारण असे की, मागच्या लोकसभेला आपण विनाकारण उमेदवार उभे केले होते.
आपण वारंवार सांगत आला आहात की महाराष्ट्र हीच माझी खेळपट्टी आहे. तरीही आपण दिल्लीच्या मैदानात खेळाडू उतरवलेत आणि तेही मनसेची मातृ संघटना असलेल्या शिवसेने विरोधात. त्यात पुन्हा आपण हेही सांगितले की माझे खासदार मोदींना पंतप्रधान म्हणून पाठिंबा देतील. लोकांना जर असे वाटले असेल की सरळ घास घेण्यापेक्षा उलटा का घ्यावा, तर त्यांचे काही चुकले असे म्हणता येणार नाही. म्हणजे सरळ भाजप-सेनेलाच का मतदान करू नये. म्हणूनच लोकांनी भाजपला आणि भाजपची युती असलेल्या शिवसेनेलाच मते देऊन निवडून दिले.
आता आपण जसा निर्णय घेतला आहे की खासदारकीची निवडणूक यापुढे मनसे लढणार नाही हाच निर्णय जर तेव्हा घेतला असता तर झाकली मुठ सव्वा लाखाची झाली असती. इतकी अधोगती झाली नसती. कारण तेव्हा आपला बराच दरारा होता. म्हणून तर नितिन गडकरींना आपल्या घरी येऊन आमच्या विरोधात उमेदवार उभे करू नका अशी विनवणी करावी लागली होती. बोलू नये पण बोलल्या शिवाय राहवत नाही. गडकरी काय आले अन 'भुरळली शेळी आणि लागली लांडग्याच्या पाठीमागे' अशी आपली गत झाली. लांडगेच ते. भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्ष नको आहेत. प्रादेशिक पक्षांना ते कधी शेळीसारखे खातील त्याचा भरवसा नाही. असो. झाले ते झाले. पण यापुढे अशा पक्षांपासून सावध रहा म्हणजे झाले. त्यांच्या जवळ जाऊन तोटाच होईल, ही रेल्वे इंजिन वरची चिमणी आहे. (काळ्या दगडावरची रेघ ऐवजी आपले इंजिन उदाहरणादाखल घेतले.) गरज सरो आणि वैद्य मरो अशी त्यांची रीत आहे. भाजपने मागच्या वर्षीच २५ वर्षांची युती तोडून याचा पुरावा दिला आहे.
आता मुळ मुद्याला हात घालतो. भाजपचे मधाचे बोट काय काय परिणाम करते ते आपण पाहिलेच. त्याचाच परिणाम म्हणून लोक आपल्याला राजकारणातून बाद करायला निघाले आहेत. म्हणूनच कल्याण-डोंबीवली महापालिकेत आपण २७ चे ९ वर आलो आहोत. तरी हरकत नाही. या ९ नगरसेवकांमुळे सुद्धा आपण भविष्यात मोठे यश गाठू शकता. अकबर बिरबलाची एक गोष्ट आहे. २७ मधून ९ गेले तर उरले काय? तर उत्तर आहे काहीच नाही. हे कसे तर २७ नक्षत्रांपैकी पावसाचे ९ नक्षत्र वजा केले तर काहीच शिल्लक राहत नाही. पाऊस नाही तर काही नाही. म्हणून आपले जे ९ नगरसेवक निवडून आले आहेत, ते पावसा इतकेच महत्वाचे समजा. आणि त्यांचा योग्य तो वापर करा.
म्हणजे काय करा की, आता जी कल्याण-डोंबिवली महापालिकेची त्रिशंखू अवस्था झाली आहे, तिला योग्य तो आधार द्या. शिवसेना आपली आहे. सेनेचे अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. म्हणून देऊन टाका शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा. भाजपचा घोडेबाजार आपोआप थांबेल. वळणावर येतील. लोकही शबासकी देतील.
करता राजसाहेब इतके? कराच! मग बघा! पुढचा काळ गौरवशाली असेल. उद्धव आणि तुम्ही एकत्र आलात तर सर्वांचीच पळता भूई थोडी होईल.
लोभ आहेच, तो आणखी वृद्धिंगत व्हावा हीच इच्छा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा