शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०१५

कम्युनिस्ट

दिनांक: भारतीय सौर २३ श्रावण शके १९३७,
१४ आॅगस्ट, २०१५

मला हे कळत नाही की हे सर्वच कम्युनिस्ट गबाळेपणाने का राहतात. दाढी काय वाढवतील, केस काळे करणारच नाहीत. काही जणांची दाढीतर वडाच्या पारंब्या सारखी कशीही,  कुठेही वाढलेली असते. खर्च करायला पण एकदम कंजूष मारवाडी. म्हणूनच तर दाढी आणि कटींगचे पैसे वाचवत नसावेत?

एकदा मी सहजक माझ्या नात्यातील कम्युनिस्टाला याचे कारण विचारले. तर माझ्याकडे संशयास्पद रितीने पाहायला लागले. मग मीच घाबरून म्हणालो की असे तर नाही ना 'सिंपल लिव्हींग अँड हाय थिंकींग?' तर एकदमच कळी खुलली (त्यांची) आणि जीव भांड्यात पडला बिचार्‍याचा. (माझा)  'नाऊ यू आर आॅन करेक्ट पाथ' खूष होऊन बोलले. माझ्या पण जिवात जीव आला. नाहीतर हे लोक कधी काय टोमणा मारतील आणि आपल्याला खाली पाडतील याचा काही नेम नाही. 'जगातील झाडून सारे लोक वेडपट आहेत. हेच फक्त विचारवंत.' असे त्यांचे ठाशीव मत असते. बाकी काही असू देत पण यांचा  गबाळेपणा मला नेहमीच खटकतो. असो.

रशियाचे विघटन झाले. तुकडे तुकडे झाले. याचे सर्वात मोठे दुख यांना. तर चीन महासत्ता होतोय याचा सर्वात मोठा आनंद पण यांनाच. अमेरिका यांची दुष्मन. तर रशिया-चीन दोस्त. १९६२ चे चीनचे युद्ध भारतामुळे झाले असे यांचे ठाम मत असते.

तसे ते असतात हुशार, बुद्दिवंत, अभ्यासू, वादविवाद करण्यात पटाइत. त्यातच सर्वात मोठा आनंद घेतात. वादविवाद म्हणजे यांचा खुराक. वाद घालतात आणि बुद्धी तल्लख ठेवतात.

यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे हे सतत गरिबांचे कैवारी असतात आणि श्रीमंतांचे सतत दुष्मन. गरिब कधीकाळी श्रीमंत झाले तर त्या गरिबांचेही हे दुष्मन होणार याची १०० टक्के शाश्वती, खात्री. मग कधीकधी शंका येते की यांना गरिबांना गरिब ठेवण्यातच रस आहे की काय?

या कम्युनिस्टांना लाल सलाम!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा