दिनांक: भारतीय सौर ३१ वैशाख शके १९३७,
(२१ मे २०१५)
'भारत माझा देश आहे. तो मागच्या मे २०१४ पासूनच माझा झाला आहे. त्यापूर्वी तो काँग्रेसचा होता. ते आणि इतर सटरफटर पक्ष आणि त्यापक्षांचे कार्यकर्ते माझे बांधव बिलकूल नाहीत. १२५ कोटी जनता माझी आहे असे जरी मी बोलत असलो तरी माझ्या कथनी आणि करणी याचा फरक करायला शिका.'
'माझ्या देशावर माझे प्रेम आहे, पण ते आताच एक वर्षापूर्वीच निर्माण झाले आहे. त्या प्रेमापोटीच मी संपूर्ण जग पालथे घालत आहे. या पूर्वी मी फक्त गुजरातवर प्रेम करत असल्यामुळे फक्त गुजरातसाठी परदेशी गुंतवणूक आणायचो. पण आता लोकांनी देशासाठी मला निवडून दिल्यामुळे नाइलाजाने देशासाठी भटकभवानीसारखे मी अनेक देश पालथे घालत आहे. 'आलीया भोगाशी असावे सादर' याशिवाय पर्याय नाही. वर्षापूर्वी मला वाटायचे 'छोडो यार' या देशात काय ठेवले आहे? या देशात मी पूर्णतः बुडालो(डुब गये), काय बी होणार नाही इथं भारतात राहून.(कुछ होगा नहीं) म्हणून मी अमेरिकेत जाण्याचा परवाना मागत होतो. माझ्या गुजरातसाठी गुंतवणूक आणायला. तब्बल १२ वर्षे. पण नाही दिला अमेरिकेने विझा. देवा! मला वाचव या काँग्रेसी खासदारांपासून आणि अमर्त्य सेन, तेंडुलकर, आणि आनंदमुर्तीसारख्या लेखकांपासून, असे माझे गार्हाणे होते एक वर्षाअगोदर. (अरे भगवान बचायें भाई) कशाला या देशात जन्म झालाय माझा? काय पाप केले होते मी मागच्या जन्मी. कोणास ठाऊक. असे वाटायचे."
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेनच कसा? काय केले माझ्या पालकांनी? अटलजींनी मला राजधर्म पाळायला सांगितला. मी पाळत असताना पण. मी अडवाणींच्या रथयात्रेचे सर्वच संयोजन केले पण ते मोठे झाले आणि मला मोठे होताना पाहून रूसून बसले. ते जोशींचे मुरली! वाजत नाही तरीही वाराणसीला मला जागा सोडत नव्हते. कसे काट्यासारखे बाजूला काढले की नाही मी. मला नाही जमत मानपान देणे. अोबानांना सर्व जग मिस्टर प्रेसिडेंट बोलत असताना मीच एकटा त्याला एकेरीत बोलू शकलो. त्याचा मान ठेवला नाही तर हे कोण चिंधीचोर? असं मी म्हणणार नाही, पण.........कसे एकेकाला मी 'मान' देतो की घेतो हे आपण पाहालच.'
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, असे तुम्हाला वाटत असेलतर, ते सब झुठ आहे. काय परंपरा? तीस वर्षे भारतात बहुमाताचे सरकार नव्हते, त्याचा आभिमान बाळगू की काँग्रेसने साठ वर्षे देशाला लुटले त्याचा? इतर परंपरा मी मानत नाही. व्यवसायिक परंपरा मी मानतो, कारण माझ्या रक्तातच व्यवसाय आहे. मी अदानी, अंबानी या परंपरा मानतो आणि म्हणूनच
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. आणि परदेशातून भारतात पैसा आणेल. कसाही! अंबानी-अदानी हे माझे देशबांधव असून त्यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे"
जय हिंद!
(ही प्रतिज्ञा काही प्रकट, तर काही मनातल्या मनात आहे, याची नोंद घ्यावी.)
ताक: नमोभक्त, नमोरुग्ण यांनी ही प्रतिज्ञा खरी की खोटी याचा शोध घेण्याच्या भानगडीत पडू नये. अस्मादिकाला 'मोदीवरोध' झालाय. हा त्यावर औषधी काढा घेतलाय बस. तसेच या रोगावर नवीन औषधही सूचवू नये ही विनंती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा